नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंची हनुमानाशी तर शरद पवारांची रामाशी तुलना


मुंबई : राज्यासमोर जीवघेण्या कोरोना व्हायरसचे संकट असताना देखील राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतच आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त फोटो ट्विट केला आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवर आमदार नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. ज्यात उद्धव ठाकरे हे हनुमान म्हणून दाखवण्यात आले आहेत. ज्या प्रकारे हनुमानाच्या छातीत श्रीराम आणि सीता मातेचा फोटो दिसला होता, त्या जागी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. नितेश राणे यांनी या फोटो द्वारे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांची तुलना थेट हनुमानाशी तर शरद पवार यांची प्रभू रामचंद्राशी तुलना केली आहे. दरम्यान हा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड करण्यात आलेला असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे. तसेच या फोटोसोबत त्यांनी ‘बाळासाहेब ठाकरे कुठे आहे?’ असा सवालही उपस्थितीत केला आहे.

परंतु, हा फोटो शेअर करुन नितेश राणे यांनी ट्विटर युझर्सची नाराजी ओढावून घेतली आहे. पवनसूत हनुमान आणि प्रभू श्रीरामाच्या जागी इतर चेहरे लावून हिंदू धर्मीयांच्या भावनेला हात घालू नका, हिंदूच्या भावना दुखावू नका, असा इशाराच राणेंना देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आणि निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. तर निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात अद्यापही ट्विटवर शाब्दिक चकमक उडत आहे.

Leave a Comment