शॅम्पू वापरताना ही काळजी घ्या…


टीव्हीवर येत असणाऱ्या शॅम्पूच्या जाहिरातीतिल मॉडेल सारखे आपले केस दिसावेत अशी इच्छा , स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाचीच असते. टीव्हीवरच्या मॉडेलचे दिसतात तसे चमकदार, रेशमी केस तुम्हाला हवे असल्यास अमुक एक शम्पू वापरा असा प्रेमळ संदेशही जाहिरातीद्वारे दिला जातो. पण नुसत्या शॅम्पूच्या वापराने केस सुंदर, चमकदार होतील ही समजूत मात्र चुकीची म्हणावी लागेल. शॅम्पू वापरताना काही गोष्टींची योग्य काळजी घेतली तर आपले केस निश्चितच सुंदर दिसतील. मात्र शॅम्पूच्या अयोग्य वापरामुळे केस राठ होणे, कोरडे होणे, डोक्याची त्वचा कोरडी पडून खाज सुटणे, क्वचित केस तेलकट दिसणे अश्या तक्रारी सुरु होतात. ह्या तक्रारी टाळण्यासाठी कुठला शॅम्पू वापरावा याबरोबरच तो कसा वापरावा याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

शॅम्पू केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित ओले करून घ्यावेत. केस पुरेसे ओले नसतील तर शॅम्पू केसांमध्ये व्यवस्थित पसरणार नाही. केस पाण्याने नीट ओले केलेले असतील तर अगदी थोडा शम्पू ही केस धुण्यासाठी पुरतो. किंबहुना केसांना शॅम्पू लावण्याआधी त्यात अगदी किंचित पाणी मिसळल्यास शॅम्पू केसांमध्ये व्यवस्थित पसरून केसांची सफाई करतो. त्याचबरोबर परत परत केसांच्या त्याच त्याच भागांवर शॅम्पू लावला जात नाही ना हे पाहावे. शॅम्पू केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थित लावावा. त्याचबरोबर शॅम्पू मानेपासून लावण्यास सुरुवात करून सावकाश कपाळाच्या दिशेने लावत जावे. या मुळे शॅम्पू सर्व केसांवर व्यवस्थित लागेल. त्यानंतर हलक्या हाताने मालिश करत केस धुवावेत.

काहीजणांना शॅम्पू लावून केस धुतल्यानंतर परत एक दोन वेळा शॅम्पू लावायची सवय असते. अश्या प्रकारच्या शॅम्पूच्या अतिरिक्त वापरामुळे केस व डोक्याची त्वचा कोरडे पडण्यास सुरुवात होते. केस धुताना जोरजोरात चोळून धुण्याची सवयही टाळावी, या मुळे केसांच्या मुळांना धक्का लागून केस सहजी तुटू शकतात.

शॅम्पूच्या जोडीला वापरली जाणारी अजून एक वस्तू म्हणजे कंडीशनर. आपल्या केसांसाठी योग्य कंडीशनर निवडावा. हेअर कलर वापरत असल्यास त्यासाठी वेगळे शॅम्पू आणि कंडीशनर बाजारात उपलब्ध आहेत, त्यांमधून आपल्या केसांसाठी योग्य ते प्रकार निवडावेत. कंडीशनर केसांच्या मुळांशी न लावता केसांवर लावावा. कंडीशनर केसांना लावताना हातानेच लावावा, कंगव्याने पसरवू नये. शॅम्पू आणि कंडीशनर च्या वापरानंतर केस भरपूर पाण्याने धुवावेत, जेणेकरून शॅम्पू किंवा कंडीशनर चा कुठल्याही प्रकारचा अंश केसांमध्ये राहणार नाही. केस धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये. त्यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते. केस धुण्याकरिता कोमट पाण्याचा वापर करावा. अश्या काही गोष्टींची काळजी आपण घेतली तर आपले केस ही सुंदर, चमकदार राहतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment