शिवप्रेमी शेतकऱ्याने शेतात साकारले ‘सरसेनापती हंबीरराव’चे भव्य पोस्टर


देशासोबतच राज्याला देखील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यातच कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनपासून शेतकरीसुद्धा बचावलेला नाही. त्यातच लॉकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग करून काहीतरी वेगळे करुन दाखवण्याचा ध्यास धरुन एका शिवप्रेमी युवा शेतकऱ्याने भारतात फारशी प्रचलित नसलेल्या ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य आणि ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे पोस्टर आपल्या गव्हाच्या शेतात साकारले आहे.

90 बाय 45 फुट एवढ्या मोठ्या आकाराची कलाकृती मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात पिंपळगाव या ठिकाणी साकारण्यात आली आहे. या पोस्टरला 20 दिवसांच्या परिश्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श, प्रेरणा मानणारे युवा शेतकरी अभयसिंह आडसुळ यांच्या संकल्पनेतून तेथील जिल्हा परिषद शाळेत कलाशिक्षक असलेल्या कुंडलीक राक्षे, तसेच शिवप्रेमी अक्षय पोते यांनी मूर्त स्वरूप दिले आहे.

एका युवा शेतकऱ्याने, कलाशिक्षकाने लॉकडाऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा संकटकाळात एका सकारात्मक विचार करून साकारलेले हे ‘पॅडी आर्ट’ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार यात काही शंका नाही. ही कलाकृती पाहिल्यानंतर प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचा व्हिडीओ फोटो शेअर करत लिहिले आहे, अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली. बहुदा याला ग्रास आर्ट म्हणतात. कुंडलिक मी तुला ओळखत नाही पण माझा शब्द आहे तुला, तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार, असे म्हणत प्रविण तरडेने या शिवप्रेमी शेतकऱ्याचे कौतुक केले आहे.

Leave a Comment