जगभरातील 20.78 लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर केली मात


मुंबई : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे थैमान कायम असून जगभरात कोरोना बाधितांचा आकडा जवळपास 52 लाखांवर पोहचला आहे. तर जगभरात मागील 24 तासात 1,05,766 कोरोनाची लागण झालेले नवीन रुग्ण समोर आले आहेत तर काल दिवसभरात कोरोनामुळे 4,833 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 51,94,099 लोकांना जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 34 हजार 072 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे जगभरातील 20 लाख 78 हजार 536 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 39 लाखांच्या घरात आहे.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाची लागण झालेले 1,18,226 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 3,584 बळी गेले आहेत. सध्या भारतात 66,089 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 48,553 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 16,20,457 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनामुळे 96,295 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 36,042 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,50,908 एवढी आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,940 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,80,117 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,486 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,28,006 एवढा आहे.

अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 96 हजारांवर गेला आहे.

Leave a Comment