पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी


पुणे : देशभरात प्लाझ्मा थेरीबाबत चर्चा सुरू असतानाच पुण्यातून आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील एक कोरोनाबाधित रुग्ण प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनामुक्त झाला असून प्लाझ्मा थेरेपीमुळे रुग्ण कोरोनामुक्त होण्याची राज्यातील शासकीय रुग्णालयातील ही पहिलीच वेळ आहे.

6 मे रोजी नायडू रुग्णालयात कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाल्यानंतर या रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा रक्तातील 1 घटक ससून रुग्णालयात दान देऊन गंभीर रुग्णाचा प्राण वाचवला आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर 1 महिन्यात त्याच्या रक्तामध्ये कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. प्लाझ्मा देण्याची ससून रुग्णालयातील प्रक्रिया मागील आठवड्यात यशस्वीरित्या पार पडली.

2 RTPCR चे रिपोर्ट पंधराव्या दिवशी निगेटिव्ह आल्यानंतर आज रुग्णाला कोव्हिड वार्डमधून हलविण्यात आले आहे. उपचार केलेल्या रुग्णाला उच्च रक्तदाब, हायपोथाराईडीझम व अतिस्थूलपणा हे आजार होते. कोरोनाच्या आजारात अशा रुग्णांमध्ये जास्त गुंतागुंत होऊन बऱ्याचदा रुग्ण दगावतात. पण दोन दिवस 10 आणि 11 मे रोजी प्लाझ्मा (200 एमएल प्रतिदिन) या व्यक्तीला वेळीच दिल्याने रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. या रुग्णाला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे ससून रुग्णालयातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ICMR च्या मार्गदर्शक तत्वानुसार Convalescent Plasma Therapy रक्तगटानुसार देण्यात आला आहे. 20 मे रोजी दुसऱ्या रुग्णासाठी प्लाझ्मा थेरपी सुरू केली असून, रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. कोरोनाच्या आजारातून बरा झालेला रुग्ण, 28 दिवसांपेक्षा जास्त लक्षणे नसलेला प्लाझ्माचे दान करू शकतो. 18 वर्षांपेक्षा जास्त असलेला पुरुष किंवा मुलबाळ नसलेली महिला प्लाझ्माचे दान करून रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत करू शकतात. प्लाझ्मामध्ये नव्याने आयत्या असलेल्या अँटीबॉडीज कोरोनाच्या रुग्णांना वरदान ठरणार असल्याचे ससूनचे अधिष्ठाता यांनी सांगितले आहे.

Leave a Comment