जागतिक आरोग्य संघटनेची माहिती; कोरोनावरील महत्वाच्या ८ लसींची चाचणी सुरु


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर कोरोनासारख्या महामारीचे संकट ओढावले आहे. या संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. पण अद्याप म्हणावे तसे यश कुणाला मिळालेले नाही. त्यातच आशेचा किरण म्हणजे सध्या जगभरात कोरोनावरील महत्वाच्या ८ लसींची वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. तर इतर ११० लस संपूर्ण जगभरात विकसित होण्याच्या विविध टप्प्यातून जात असल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिलेल्या माहितीच्या आधारे दिले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या आजाराचा फैलाव संपवण्याची जगातील सर्व देश एकजूट होऊन तयारी करीत आहेत. या घातक व्हायरसला मूळापासून संपवण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेचे यामध्ये अमेरिका, चीन आणि जर्मनी नेतृत्व करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीत लस तयार करण्याच्या तारखाही अमेरिका आणि चीनसहित इतर अनेक देशांनी जाहीर केल्या आहेत.

चीनचे आरोग्य अधिकारी झांग वेनहोंग यांनी शनिवारी म्हटले की, कोरोनाचा खात्मा करणारी लस 2021 च्या मार्चमध्ये तयार झालेली असेल. पण सध्या लस तयार करण्यात मोठी अनिश्चितता आहे. कोरोनाला संपवण्यासाठी आजवर कोणतीही चांगली लस निर्माण होऊ शकलेली नाही. उलट एखादी लस यासाठी प्रभावी ठरु शकली तरी ती तयार होण्याची शक्यता पुढील वर्षी मार्च ते जून दरम्यानच असेल, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आपल्याला या वर्षा अखरेपर्यंत लस मिळेल. त्याचबरोबर हाच दावा जगातील इतरही अनेक देशांच्यावतीने देखील करण्यात आला आहे की यावर लवकरच प्रतिबंधक लस शोधली जाईल.

Leave a Comment