नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून कोरोनाग्रस्तांचा आकडेवारीत शुक्रवारी भारताने चीनला मागे टाकले होते. तर काल देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजारांच्या पुढे गेला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९० हजार ६४८ झाली आहे. गेल्या आठ दिवसातील कोरोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील कोरोनाने आता ग्रामीण भागात शिरकाव केल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
देशातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव; देशातील बाधितांचा आकडा ९० हजारांच्या पुढे
देशातील मोठ्या शहराची परिस्थिती चिंताजनक असून एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरात असून या पाच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास ४६ हजार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या दोन हजार ८७१ एवढी असून, आतापर्यंत ३४ हजार २२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्राच्या बाबत सांगायचे झाले तर एका दिवसात १६०६ नव्या रुग्णांची भर पडली. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. चोवीस तासांत ६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यात मुंबईतील ४१ जणांचा समावेश आहे.
दरम्यान जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून देशभरात आतापर्यंत ४५ लाखांपेक्षा जास्त जणांना याची बाधा झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत भारत जगात ११ व्या स्थानी आहे, तर यामध्ये अमेरिका, रशिया, ब्राजील, फ्रान्स, इटली, स्पेन आणि पेरु या देशानंतर भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या आधिक आहे.