पुढील महिन्यांच्या ६ तारखेपासून ‘या’ देशात रंगणार क्रिकेटचे सामने


सिडनी – कोरोना सारख्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील बहुतेक देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहेत. पण या लॉकडाऊनमुळे क्रीडा जगताला मोठा फटका बसला आहे. बहुतांश क्रीडा स्पर्धा गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण या क्रीडा स्पर्धांवर अवलंबून असलेले अर्थकारण आणि सामन्यांअभावी होत असलेले आर्थिक नुकसान लक्षात घेता जगभरातील स्पर्धांना हळुहळु सुरुवात होत आहे. जर्मनीतल्या जगप्रसिद्ध Bundesliga फुटबॉल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या क्रिकेट जगतातील सामनेही आता सुरु होणार आहेत. पुढील महिन्याच्या ६ तारखेपासून ऑस्ट्रेलियात स्थानिक क्लब क्रिकेटच्या सामन्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.

ऑस्ट्रेलियात ६ जूनपासून Darwin and District Cricket T-20 स्पर्धेला सुरुवात होते आहे. सरकारने या स्पर्धेसाठी आयोजकांना काही खास नियम आखून दिले आहेत. ज्यात गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा घामाचा वापर करण्यात मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल आयोजकांना स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना द्यायचा आहे. नियमांचे उल्लंघन खेळाडूंकडून होऊ नये यासाठी आणखी उपाययोजना करण्याच्या तयारीत आयोजक असल्याचेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियात या वर्षाअखेरीस टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पण ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन घोषित केले असल्यामुळे आता या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २८ मे रोजी होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment