महाराष्ट्रासाठी मोदी सरकारकडे राहुल गांधींची मागणी


मुंबई – आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्रासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून केंद्र सरकारने सर्वोतोपरी महाराष्ट्राला मदत केली पाहिजे असे मत व्यक्त करत केंद्राने राज्याला पूर्ण पाठिंबा देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. एका पत्रकाराने याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना महाराष्ट्राला केंद्राने अधिक मदत करायला हवी का अशा संदर्भातील प्रश्न विचारला. महाराष्ट्र हे एक मोठे राज्य तर आहेच पण त्याचबरोबर ते एक अद्वितीय राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा महाराष्ट्र हा केंद्रबिंदू असल्यामुळे केंद्राचा पूर्ण पाठींबा महाराष्ट्राला मिळायला हवा, असे उत्तर राहुल गांधी यांनी त्या प्रश्नाला दिले. त्याचबरोबर केंद्र सरकारने देशातील सर्वच राज्यांना मदत करायला हवी. कारण राज्य सरकारच्या माध्यमातूनच कोरोनाविरुद्धची लढाई लढणे अधिक सोयीस्कर ठरेल. या लढाईचे नेतृत्व राज्य सरकारच करु शकतात. केंद्र सरकारचे व्यवस्थापन पाहणे हे काम असून राज्य सरकारांनी प्रत्यक्षात अंमलबाजवणी करण्याचे काम केले पाहिजे. काम मॅनेज करण्याचे केंद्राने करायचे आहे तर राज्यांनी ते काम ऑपरेट करायचे असल्याचेही राहुल यांनी यावेळी सांगितले.


केंद्र सरकारने ज्यापद्धतीने राज्य सरकारांना पैसे दिले पाहिजेत त्यापद्धतीने निधी पुरवला जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. त्यांची यासंदर्भात विचारसरणी वेगळी असेल. केंद्रीयकरणाच्या माध्यमातून या संकटाला तोंड देण्याची त्यांची योजना असेल. पण मला असे वाटत नाही. त्यांनी राज्य सरकारांच्या माध्यमातून काम करण्याची गरज असल्याचा सल्लाही राहुल गांधी यांनी दिला. राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारला जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर पुनर्विचार करावा असा सल्लाही दिला आहे. यावेळी त्यांनी पैसे शेतकरी, मजुरांच्या थेट खिशात द्या या मागणीचा पुनरुच्चार केला.

Leave a Comment