अन्यथा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्हाला देखील आंदोलन करावे लागेल


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि राज्यात सध्या लॉकडाऊन लागू आहे. पण लॉकडाउनच्या या नियमांमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर महानगरी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टचादेखील या अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे बेस्टची सेवाही या कठिण काळात सुरू आहे. काही बेस्ट कर्मचाऱ्यांनाही अशा परिस्थितीत कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर काही मागण्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या.

त्यातच विधान परिषदेचे विरोधीपक्ष आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हालाही मानवतेच्या भावनेतून त्यांच्यासोबत आंदोलनात उतरावे लागेल, असा इशारा दिला आहे. बेस्टच्या १०८ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा. मुंबईकरांचे जीव वाचविणारे योद्धे म्हणून कार्यरत असणारे बेस्ट कर्मचारी आता स्वतःसाठी लढत आहेत. तर त्यांचे ऐकायला हवे! त्यांच्या जीविताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी. त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हालाही त्यांच्या आंदोलनात मानवतेच्या भावनेतून उतरावे लागेल, असे म्हटले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • कोरोनाबाधित झाल्यावर कर्मचाऱ्याचे आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचे विलगीकरण करण्यात यावे.
  • प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची कोरोना चाचणी रोज करण्यात यावी.
  • बेस्ट कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्र बसगाड्या सुरू कराव्यात.
  • कोरोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत.
  • कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि कोरोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडलेले बेस्ट,
  • पालिका व अन्य आस्थापनातील, पोलीस कर्मचारी यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती त्यांना देण्यात याव्यात.

Leave a Comment