पतीच्या आठवणीने व्याकुळ झाली सानिया मिर्झा


जीवघेण्या कोराना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्याचबरोबर जगभरातील अनेक स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे अनेकांची ताटातूट झाली आहे. पण त्याचे परिणाम आता समोर येऊन लागले आहेत. त्यात आता काही दिग्गज खेळाडूंचे धीर आता थोडासा का होईना सुटू लागला आहे.

लॉकडाऊनमुळे स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा मुलगा इझान सध्या भारतात आहेत, तर सानियाचा पती शोएब मलिक हा पाकिस्तानात अडकला आहे. टेनिस कोर्टवर काही महिन्यांपूर्वी पुनरागमन केलेल्या सानिया मिर्झाने चांगली कामगिरी केली. सानिया मध्यंतरीच्या काळात स्पर्धेसाठी अमेरिकेत तर पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेत शोएब मलिक खेळत होता. पण त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे सानिया आणि शोएब आपापल्या देशांमध्ये अडकले आहेत.

पाकिस्तानात शोएब अडकला आहे, तर मी भारतामध्ये. अशा परिस्थितीचा सामना करणे आमच्यासाठी खूपच कठीण आहे, कारण आम्हाला लहान मुलगा आहे. आपल्या बाबांना इझान पुन्हा कधी पाहू शकेल मला माहिती नाही. आम्ही दोघेही खूप सकारात्मक आहोत, त्याचबरोबर आम्हाला आजुबाजूच्या परिस्थितीची जाण आहे. शोएबची आई ६५ वर्षांची आहे, तिची काळजी घेणेही या काळात गरजेचे आहे. आपण सर्वजण सध्याच्या काळात तंदुरुस्त राहू आणि लॉकडाउन संपल्यानंतर एकमेकांना पुन्हा भेटू हीच इच्छा सध्या माझ्या मनात असल्याचे सानियाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या फेसबूक लाईव्ह मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

आपल्या मनात सध्याच्या खडतर काळात टेनिस किंवा सरावाचा विचार येत नसल्याचेही तिने स्पष्ट केले. सध्याच्या घडीला बाहेरील परिस्थिती गंभीर आहे, माझ्या लहान मुलाची अशा परिस्थितीत सुरक्षा कशी केली जाईल हाच विचार पहिला माझ्या मनात येतो. घरात आई-बाबा असल्यामुळे त्यांचीही या कामात मदत होते.

Loading RSS Feed

Leave a Comment