अमेरिकेचा आरोप; कोरोनाच्या संशोधनातील डेटा चोरत आहे चीन


वॉशिंग्टन – जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरातील जवळपास सर्वच देशांना आपल्या विळख्यात घेतले असून कोरोनाचा बिमोड करण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेला बसला कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या त्याचबरोबर मृतांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान, सगळ्याच देशांच्या रडारावर असलेल्या चीनवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी मोठा आरोप केला आहे. माईक पॉम्पिओ यांनी चीनवर कोरोना व्हायरसवरील संशोधनातील बौद्धीक संपदा आणि कोरोनाच्या संशोधनातील डेटा चोरत असल्याचा आरोप केला आहे.

कोरोनाशी निगडीत ज्या संस्था संशोधन करत आहेत, चीनमधील सरकारशी निगडीत कंम्प्युटर हॅकर्सद्वारे त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते असा दावा एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी विभागाद्वारे करण्यात आला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर पॉम्पिओ यांनी लगेचच चीनवर कोरोनाच्या संशोधनाचा डेटा चोरत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिका चीनशी संबंधित असलेल्या सायबर हॅकर्सने केलेल्या प्रयत्नांचा निषेध करते आणि त्याचबरोबर अशा कारवाया थांबवल्या पाहिजेत असे आम्ही आवाहन करतो, असे पोम्पिओ यांनी एका निवेदनात म्हटले आहे. चीन हा तोच देश आहे ज्या ठिकाणी या व्हायरसची उत्पत्ती झाली आणि हा व्हायरस त्यांच्यामुळेच जगभरात पसरला. कोरोना व्हायरसशी निगडीत माहिती जगाला देण्यास चीनने मनाई केल्यामुळेच आज जगावर मोठी आपत्ती आल्याचे पॉम्पिओ म्हणाले.

Leave a Comment