नाथाभाऊंसारख्या नेत्यावर ही वेळ येणे पक्षासाठी चांगले नाही; नितीन गडकरींनी सोडले मौन


नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या नावावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर भाजपमध्ये बराच वाद उभा राहिला. पक्षाच्या केंद्रीय समितीने पक्षाच्या निष्ठावंत ज्येष्ठ नेत्यांना डावलून उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. पण यावरून भाजपमधील वातावरण चांगलेच तापले होते. भाजपचे नेते आणि केंद्रीय नितीन गडकरी यांनी मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर मौन सोडले असून त्यांनी खडसेंप्रति सहानुभूती व्यक्त केली.

नाथाभाऊ विधान परिषदेसाठी इच्छुक होते. त्यांनी तशी इच्छा पक्षाकडे बोलून देखील दाखवली होती. त्यांच्यासोबतच विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील विधान परिषदेवर पाठवले जाईल, अशी देखील चर्चा होती. पण भाजपने सगळ्यांनाच धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर खडसे यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. आपल्या तिकीट राज्यातील नेत्यांमुळेच मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावरून एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात बराच कलगीतुरा रंगला होता. आता नितीन गडकरी यांनी या सगळ्या वादावर भाष्य केले आहे.

नितीन गडकरी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, मी आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम केले आहे. खडसे यांची पक्षाचा विस्तार करण्यात भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांनी अतिशय प्रतिकूल काळात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात मोठे काम करत पक्षाला यश मिळवून दिले. पण त्यांना जी वागणूक आज दिली जात आहे ती दुःखद आहे. एवढी वर्षे पक्षाशी निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर वा नेत्यावर ही वेळ येणे पक्षासाठी चांगले नाही. त्याबद्दल मी फक्त दुःख व्यक्त करू शकतो, त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नसल्याचे म्हणत गडकरी यांनी आपली खंत व्यक्त केली.

Leave a Comment