महाराष्ट्र सरकार भूमीपुत्रांसाठी स्थापन करणार ‘कामगार ब्युरो’


मुंबई : महाराष्ट्रातील लाखो परप्रांतीय मजूर कोरोनाच्या संकटामुळे आपल्या स्वगृही परतले असल्यामुळे राज्यातील भूमीपुत्रांना आता रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकार या संधी मिळवून देण्यासाठी कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.

राज्यातील महामार्गावरुन रोज लाखोच्या संख्येने मजूर मिळेल त्या साधनाने, तसेच वेळ आली तर पायी आपल्या राज्यात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या परप्रांतीय मजूरांचे घोळके राज्याच्या अनेक सीमांवर दिसत आहेत. कोरोनाचे संकट आल्यामुळे राज्यातील लाखो कामगार, मजूरांनी अनेक शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून आपला संसार गुंडाळून आपले गाव गाठायला सुरुवात केल्यामुळे येथील उद्योगांसमोर एक नवे संकट उभे राहिले आहे. आता येथील उद्योगांना मजूर आणि कामगारांची कमतरता जाणवणार आहे. खर तर कोरोनामुळे राज्यातील उद्योगांसमोर उभी राहिलेली ही अडचण राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी घेऊन आली आहे. या नोकऱ्या भूमीपुत्रांना मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.

या कामगार ब्यूरोची स्थापना राज्यातील उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभागातर्फे केली जाणार आहे. या कामगार ब्यूरोकडे नोंदणी करणाऱ्या कामगारांची कुशल, अकुशल तसेच कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. यानंतर कामगारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि उद्योगांच्या गरजेनुसार नोंदणी केलेल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. संकट काळी अनेक संधी चालून येतात. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील परप्रांतीय कामगार राज्यातून निघून गेल्याने महाराष्ट्रात लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या नोकऱ्यांचा लाभ भूमीपुत्रांनी घ्यावा यासाठी सरकारही पुढे सरसावले आहे. आता राज्यातील मराठी तरुणांनीही एक पाऊल पुढे टाकून या नोकऱ्यांमध्ये संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.

Leave a Comment