बच्चू कडूंच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस उत्तीर्ण


मुंबई – देशासह राज्यावर कोसळलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या एकट्या महाराष्ट्रात असून कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यालाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संकटात महाराष्ट्र सरकारच्या जोडीला आपले कोरोना वॉरिअर्स देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देत आहेत. त्याचबरोबर रस्त्यांवर पोलीसदेखील लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची पूरेपुर काळजी घेत आहेत. दरम्यान राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू पोलीस आपले काम व्यवस्थित करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले होते. पोलिसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी बच्चू कडू यांनी स्टिंग ऑपरेशनच केले.

बैदपुरा भागातील कंटेनमेंट झोनमध्ये बच्चू कडू यांनी आपली ओळख लपवून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. आपला चेहरा पोलिसांना दिसू नये यासाठी फाटे चौक येथे बच्चू कडू यांनी कापड गुंडाळले. बच्चू कडू दुचाकीच्या मागील सीटवर बसले होते. आपल्याला पोलिसांनी ओळखू नये यासाठी त्यांनी स्वत:देखील पोलिसांशी भाष्य करणे टाळले. आपल्याला आत सोडा म्हणून पोलिसांकडे त्यांच्यासोबत असणारी व्यक्ती विनंती करत होती.


पण त्यांना पोलिसांनी आत सोडले नाही. याउलट कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी त्यांना चार शब्द सुनावल्यामुळे पोलीस बच्चू कडू यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उत्तीर्ण झाले . बच्चू कडू यांनी यावेळी पोलिसांना कंटेनमेंट झोनमध्ये अतिशय कडक अशी नियमांची अंमलबजावणी करावी, अशी सूचना केली.

Leave a Comment