थकलेल्या पोलिसांच्या मदतीसाठी राज्याच्या गृहमंत्र्यांची मोदी सरकारकडे मोठी मागणी


मुंबई : कोरोनासारख्या महामारीचा देशासह महाराष्ट्र देखील सामना करत आहे. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या कामासाठी राज्यातील पोलीस कर्मचारी देखील अहोरात्र सेवा देत असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. त्याचबरोबर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वीस कंपन्यांची मागणी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्य राखीव पोलीस दलाच्या राज्यात 32 कंपन्या कार्यरत आहेत. पोलीस दल त्यांच्या मदतीने कार्य करत आहे. पण पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या पोलिसांना विश्रांतीची गरज असल्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, अहोरात्र सेवा करत कर्तव्य तत्पर असलेल्या आरोग्य सेवा तसेच पोलीस दलालाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर शंकर वाघमारे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवडी पोलीस स्टेशन येथे ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment