दारुची होम डिलिव्हरी अजून एक दिवस लांबणीवर


मुंबई – महाराष्ट्र सरकारने दारुची होम डिलिव्हरी करण्यास पुरवण्यास सशर्त संमती दिली असून जीवनावश्यक सेवा वगळता लॉकडाउनमध्ये सारी दुकाने बंद करण्यात आली. पण ३ मेनंतर केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार काही सेवा सुरु करण्यात आल्या. दारुविक्रीचा परवाना असलेली दुकाने उघडण्याची सशर्त संमती ज्यामध्ये देण्यात आली. पण त्या अटींचे सर्रास उल्लंघन होऊ लागल्यामुळे मुंबई-पुण्यासह शहरांमधील मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य सरकारने दारुच्या होम डिलिव्हरीला सशर्त संमती दिली आहे.

सरकारच्या या निर्णयामुऴे राज्यातील मद्यप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण मद्यप्रेमींना सेवा घेण्यासाठी एक दिवस आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. ही सेवा उद्यापासून म्हणजे १४ मेपासून सकाळी १० वाजल्यापासून सुरु कऱण्यात येणार होती. पण हा निर्णय आता एक दिवस पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता १५ तारखेची वाट मद्यप्रेमींना पहावी लागणार आहे.

१४ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली होती. पण आता नव्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळवणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे अशा प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस लागेल, असे क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यामुळे आदेशाची अंमलबजावणी १४ तारखेऐवजी १५ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

पण काही अटी आणि शर्थीही यावेळी लागू करण्यात आल्या आहेत. ही सेवा फक्त परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना देता येणार आहे. सोबतच ही सेवा ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच घेता येणार आहे. याशिवाय घरपोच सेवा देण्याची जबाबदारी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. सोबतच डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी आवश्यक असल्याची माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट ऑनलाइन मिळेल याची सुविधाही उपलब्ध असल्याचे कांतीलाल उमाप यांनी सांगितले आहे. डिलिव्हरी करणाऱ्यांना देखील ओळखपत्र दिले जाणार असून ते बंधनकारक असणार आहे. यासाठी मद्य दुकानदारांनी डिलिव्हरीसाठी पाठवण्यात येणाऱ्यांची माहिती देणे आवश्यक असल्याची माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

यात महत्वाची गोष्ट अशी की ही सेवा कंटेनमेंट तसंच रेड झोनमध्ये मिळणार नाही. ज्या जिल्ह्यातील दुकाने उघडी आहेत तिथेच ही सेवा लागू होणार आहे. ही सेवा मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद यांसारख्या रेड झोनमध्ये मिळणार नसल्याचे कांतीलाल उमाप यांनी सांगितले आहे. काही जिल्ह्यात मद्याची दुकाने उघडलेली नाही, तिथे ही सेवा सुरु करता येणार नाही. स्थानिक प्रशासनाने वेगळा निर्णय़ घेतला तर त्याठिकाणी ही सेवा सुरु करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment