जगभरातील ‘या’ देशांनी केले आहेत कोरोना प्रतिबंधक लस बनवण्याचा दावा


नवी दिल्ली – जगभरातील 212 देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरससमोर सर्वच देश हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जगभरातील दोन लाख 92 हजार लोकांनी या जीवघेण्या व्हायरसमुळे आपले जीव गमावले आहेत. त्यातच जगभरातील अनेक देशांनी या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशांमध्ये लॉकडाऊन लागू केला आहे. पण या लॉकडाऊनमुळे जगभरातील अनेक लोक आपापल्या घरांमध्ये अडकून पडले आहेत.

तुर्तास तरी कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेच प्रतिबंधक औषध उपलब्ध नसल्यामुळे याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. जगभरातील अनेक या जीवघेण्या व्हायरसवर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी देश प्रयत्न करत आहेत. त्यातच अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक लस शोधल्याचा दावा केला आहे. पण यापैकी अमेरिका, ब्रिटन, चीन, इटली आणि इटली या देशांच्या दाव्यात तथ्य दिसून येत आहे. आज आम्ही तुम्हाला याच देशांनी केलेल्या दाव्यांची सद्यस्थिती आणि कोरोना प्रतिबंधक लस कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…

कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अमेरिकेतील दोन कंपन्या प्रयत्नरत असून अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅन्ड इनफेक्शियस डिजीजसोबत मॉडर्ना कंपनी ही कंपनी करत आहे. तर दुसरी कंपनी फायजर (Pfizer) असून अमेरिकेला जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका बसला आहे. जगभरातील जवळपास एक तृतीयांश कोरोनाग्रस्त तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेतील 1630 लोकांची कोरोनामुळे मृत्यू झाली आहे. तर एकूण बळी 83 हजार 425 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या 14 लाख 8 हजारांवर गेली आहे. न्यूयॉर्क प्रांतात काल 172 बळी गेले. तिथे एकूण मृतांचा आकडा 27 हजार 175 तर रुग्णांची संख्या 3 लाख 48 हजारांवर गेली आहे.

कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचा ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने दावा केला आहे. ब्रिटनच्या संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, कोरोना प्रतिबंधक लशीचे 200 रूग्णालयांतील जवळपास 5 हजारांहून अधिक लोकांवर आतापर्यंत परिक्षण करण्यात आले आहे. म्हणजेच लस तयार केली गेली असून आता तिचे सध्या माणसांवर परिक्षण करण्यात येत आहे.

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या असलेल्या चीनमध्ये तीन प्रतिबंधक लशींचे मानवी चाचणी सुरु आहे. चीनमधील कँसिनो बॉयोलॉजिक्स, इन्स्टीट्यूट ऑफ बॉयोटेक्नोलॉजी आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायन्स एकत्र येऊन पहिल्या प्रतिबंधक लशीची चाचणी करत आहेत. तर दुसऱ्या प्रतिबंधक लशीची LV-SMENP-DC चे शेंजेन जीनोइम्यून मेडिकल इंस्टीट्यूटमध्ये चाचणी सुरु आहे. त्याचबरोबर तिसऱ्या प्रतिबंधक लशीची चीनमधील वुहान प्रांतात चाचणी सुरु आहे.

इस्रायलने देखील कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा केला आहे. इस्त्रायलच्या दाव्यानुसार, जगभरातील सर्वात रहस्यमयी बायोलॉजिकल रिसर्च लॅबमध्ये कोरोनाची लस तयार करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती इस्रायलचे संरक्षणमंत्री नेफ्थाली बेनेट्ट यांनी दिली होती. इस्रायल इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडीज विकसित केल्या असल्याची माहिती दिली आहे. या अँटीबॉडीज शरीरातील विषाणूंवर हल्ला करतात आणि त्या विषाणुंना निष्क्रीय करतात. यांसदर्भातील वृत्त जेरुसलेम पोस्टने दिले होते.

कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा इटलीनेदेखील केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, इटलीतील रोमच्या स्पल्नजानी रूग्णालयात करण्यात आलेल्या परिक्षणातून अँटीबॉडीज शोधण्यात आल्या आहेत. इटलीत गेल्या चोवीस तासात कोरोनाने 172 लोकांचा बळी घेतला. इटलीतील एकूण बळींची संख्या आता 30 हजार 911 वर पोहोचली आहे. काल रुग्णांची संख्या 1402 ने वाढली, इटलीत आता जवळपास 2 लाख 21 हजारावर रुग्ण आहेत.

कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा या देशांनी केल्यामुळे या जीवघेण्यासमोर हतबल झालेल्या जगाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी ही प्रतिबंधक लस उपयोगात कधी येणार आणि जगावर पसरलेले हे कोरोनाचे सावट कधी दूर होणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

Leave a Comment