अमेरिका देणार वैदयकीय क्षेत्रातील भारतीयांना ग्रीन कार्ड!


नवी दिल्ली : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोना या जीवघेण्या व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून या व्हायरसचा सर्वाधिक फटका महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे 75 हजारांपेक्षा लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे तेथील वैद्यकीय व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. त्यातच आता अमेरिकन काँग्रेसमध्ये वैद्यकीय क्षेत्राची ही गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातील हजारो डॉक्टर, नर्सेस यांना कायमस्वरुपी कायदेशीर नागरिकत्व म्हणजे ग्रीन कार्ड द्यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

अमेरिकन काँग्रेसमध्ये यासंबंधी विधेयक सभागृहाच्या सदस्यांनी मांडले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हजारो तज्ज्ञांना ‘हेल्थकेअर वर्कफोर्स सेसिलियन्स अ‍ॅक्ट’ या कायद्यातंर्गत कायमस्वरुपी अमेरिकेत सेवा करण्याची संधी मिळू शकते. हे विधेयक कोरोनाच्या या संकटकाळात मंजूर झाल्यास अमेरिकेत काम करणाऱ्या २५ हजार नर्सेस आणि १५ हजार डॉक्टरांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व मिळू शकते.

वैद्यकीय तज्ज्ञांची लोवा सारख्या काही भागांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी गरज असल्यामुळे ती कमतरता भरुन निघेल असे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. याचा फायदा H-1B किंवा J2 व्हिसावर अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय नर्सेस आणि डॉक्टरांना होऊ शकतो. परदेशातील नागरिकांना H-1B व्हिसा अंतर्गत अमेरिकेत कंपन्यांमध्ये नोकरीवर ठेवण्याची परवानगी मिळते. दरवर्षी H-1B व्हिसावर हजारो भारतीय अमेरिकेत काम करतात.

Leave a Comment