विधान परिषद निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने पुण्यातील माजी आमदार झाल्या नाराज


पुणे – पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी विधान परिषद निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्या आहेत. कोथरुड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यावेळी विधान परिषेदसाठी उमेदवारी दिली जाईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचा उल्लेख मेधा कुलकर्णी यांनी केला होता. पण उमेदवारी पक्षाने नाकारल्यामुळे त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.


मेधा कुलकर्णी यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीची यादी जाहीर होताच ट्विटरवर एका पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत आज फिर दिल ने एक तमन्ना की….आज फिर दिल को हमने समझाया, या गाण्याचे शब्द लिहिलेले आहेत. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटमध्ये भलेही भाजपचा उल्लेख केला नसला तरी त्यांच्या ट्विटमधून उमेदवारी न दिल्याने आपणच आपली समजूत घातल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भाजपने विधान परिषद निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून डावलण्यात आले आहे. नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची भाजपच्या केंद्रीय समितीने घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

Leave a Comment