आरोग्य संघटनेचा इशारा; हलगर्जीपणा झाल्यास भोगावे लागतील गंभीर परिणाम


नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांनी देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यास सुरुवात केली असून त्यात असे मानले जात आहे की, कोरोनाचा जगभरातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पण फार हलक्यात कोरोना व्हायरसला घेऊ नका असा थेट इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील देशांना दिला आहे. किंचितसाही हलगर्जीपणा केल्यास या देशांना पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचे कारण ठरू शकतो.

भारतातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे तेथील लोक लॉकडाऊन शिथील होताच रस्त्यावर उतरलेले दिसून आले. पण यापेक्षाही वेगळी काही परिस्थिती दुसऱ्या देशांमध्ये नाही. अमेरिकेमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर अनेक लोकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये आपापल्या परीने सूट देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वच देशांना इशारा दिला आहे. आरोग्य संघटनेने सांगितले की, जर लॉकडाऊन शिथील करण्यात थोडासाही हलगर्जीपणा झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागतीलच त्याचबरोबर पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेडरोज गेब्रेयेसोस यांनी सांगितले की, लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा धोका वास्तविक आहे. देशांना जर सावध राहून आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतले नाहीत, तर कोरोनाचा कहर पुन्हा वाढण्याचा धोका आहे. कारण जगभरातील देश अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी लॉकडाऊन शिथील करत आहेत. आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, सध्या आरोग्य यंत्रणेत जगभरातील अनेक देशांना गुंतवणूक करावी लागेल आणि सर्विलांस सिस्टमवर जोर द्यावा लागेल. याचसोबत टेस्ट आणि कॉन्टॅक्ट्र ट्रेसिंगवर जोर द्यावा लागेल.

आतापर्यंत जगभरात 38 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात दररोज पाच हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशातच भिती ही आहे की, लॉकडाऊन हटवल्यानंतर हा आकडा आणखी वेगाने वाढू शकतो. तसेच जगासमोर वुहान मॉडेलही आहे, जिथून कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली. परंतु, आता दीर्घकाळाच्या लॉकडाऊननंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे.

Leave a Comment