पुण्यातील तळीरामांसाठी पोलिसांची नवी नियमावली


पुणे : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला कालपासून सुरूवात झाली असून काही अटी या तिसऱ्या टप्प्यात शिथिल करत दारू विक्रीसाठी परवाणगी देण्यात आली. दारू खरेदीसाठी पुणेकरांची तोबा गर्दी पहायला मिळाली. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचा पुर्णतः फज्जा उडाला. दारू खरेदी करणाऱ्यांची गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पण यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी दारू विक्रीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

पोलिसांनी पुण्यात दारू विक्रेता आणि खरेदी करणाऱ्या लोकांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. याच नियमांनुसार पुण्यात दारू विक्री होईल असे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काल दुपारी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दारू विक्रीसाठी हिरवा कंदील दिल्यानंतर सगळीकडे एकच गर्दी पाहायला मिळाल्यामुळे दारूची दुकाने तात्काळ बंद करण्यात आली होती. पण आजपासून पुणेकरांना टोकन घेऊन दारू विकत घ्यावी लागणार आहे.

पुण्यातील तळीरामांची ही आहे पोलिसांची नवी नियमावली

मद्यविक्रीच्या दुकान मालकांनी सोशल डिस्टंसिंग पाळले जाईल याची खबरदारी घेतली पाहिजे आणि रेड झोनमध्ये हे त्यांचे कर्तव्यच आहे.

कोणत्याही दुकानामुळे गर्दी होऊ लागली तर त्याबद्दल कारवाई केली जाईल.

वेळा घालून टोकन देण्याची पद्धत अवलंबावी. सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी लोकांना दुकानाबाहेर थांबवावे. सॅनिटायझर्सची व्यवस्था करावी.

तसेच, पूर्वीप्रमाणेच वैध परवाना असल्याखेरीज वाहनाला परवानगी नाही. यामध्ये खरेदीच्या कारणांचाही समावेश आहे. घराजवळच्या दुकानातून खरेदी करावी. वैध परवान्याशिवाय वाहन रस्त्यावर आल्यास जप्ती व किमान 2500 रुपयांच्या हमीपत्राची कारवाई होऊ शकते.

कंपन्या (ज्यांचे कारखाने पुणे मनपा हद्दीबाहेर आहेत) व कन्स्ट्रक्शन (प्रत्यक्ष जागेवर) यांना वैयक्तिक वाहनापेक्षा ‘समर्पित बस गाड्यां’च्या वाहतुकीला परवानगी आहे. या सुविधा उपलब्ध Punepolice.in येथे असल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

Leave a Comment