पुण्यात सर्वसामान्यांना मिळणार नाही पेट्रोल-डिझेल


पुणे : कालपासून देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे बदललेले नियम लागू झाले असले, तरी अद्याप पुण्यातील परिस्थिती जैसे थे आहे. शहरातील सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल पुरवठा खुला करण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. आजही सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही. फक्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीच इंधन पुरवले जाईल, असा निर्णय पेट्रोल पुरवठादारांच्या संघटनेने घेतला आहे.

याबाबत पेट्रोल डीलर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल -डिझेलबाबत नवीन सुधारित आदेश काय याबाबत संघटनेने केंद्र सरकारने तिसरा लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी दिलेल्या सूचनांनुसार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. पण सुधारित आदेश अद्याप आले नसल्यामुळे आजही पुणेकरांना दुचाकी किंवा चारचाकीसाठी पेट्रोल मिळणार नाही. जे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत किंवा सुविधा देत आहेत त्यांच्याच वाहनांना पेट्रोल-डिझेल देण्यात येईल. सामान्य लोकांनी पंपांवर विनाकारण गर्दी करून वाद घालू नयेत, अशी सूचना पेट्रोल पंपचालकांनी दिली आहे.

पुण्यात काल दिवसभरात 61 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आणि तर 6 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने कालपासून लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात बदलले आहेत. त्यानुसार पुण्यात आता निरीक्षणात आलेल्या कन्टेंमेंट झोन्समध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर उर्वरित ठिकाणी पुणेकरांना थोडा मोकळा श्वास घ्यायला परवानगी देण्यात येणार आहे.

Leave a Comment