कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रत्येक गोष्ट सॅनिटायझ करण्यास सांगितले जाते. किराणा मालाचे सामान, दूध दुकानातून घरात आणले तरी सर्वात प्रथम ते सॅनिटायझ केले जाते. काहीजण बेकिंग सोडा, तर साबणाद्वारे या वस्तू स्वच्छ करतात.
वस्तू सॅनिटायझ करणार या कंपनीचा ‘कोरोना ओव्हन’
यावर उपाय म्हणून बंगळुरू येथील स्टार्टअप कंपनी लॉग 9 मटेरियल्सने खास कोरोना ओव्हन तयार केला आहे. या कोरोना ओव्हनद्वारे मास्क, पीपीई किट्स, किराणा सामान आणि इतर गोष्टी अवघ्या 10 मिनिटात सॅनिटायझ करता येतात. वस्तू आतमध्ये ठेवल्यानंतर हे ओव्हन कोरोना व इतर व्हायरस नष्ट करण्यासाठी यूव्ही-सी लाईट नष्ट करते.
लॉग 9 मटेरियल्सचे संस्थापक आणि सीईओ अक्षय सिंघाल यांनी सांगितले की, अवघ्या 2 आठवड्यांमध्ये या ओव्हनची निर्मिती करण्यात आली आहे.
बॅटरी व प्लग इन वर चालणाऱ्या या डिव्हाईसचा वापर मायक्रोवेव्ह म्हणून सहज करता येईल. कंपनीने याच्या पेटंटसाठी देखील अर्ज केला आहे. या ओव्हनमुळे मास्क, पीपीई किट्स एकदा वापरून टाकून देण्याऐवजी त्यांना सॅनिटाइज करून पुन्हा वापरता येईल.
हे ओव्हन सरकारच्या ई मार्केटप्लेसवर उपलब्ध असून, कंपनी यांची मोठ्या स्तरावर विक्री करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
