पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले मॉब लिचिंग प्रकरणातील अटकेत असणाऱ्या आरोपींमधील जवळपास 20 आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यातच आता पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याच्या स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी 28 एप्रिलला पाठवण्यात आले होते, तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण शनिवारी सकाळी आरोपीचा प्राप्त झालेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सिव्हिल सर्जन कांसन वानेरे यांनी दिली. तसेच रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे देखील समजते आहे.
पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील एक आरोपी कोरोनाग्रस्त
पालघर येथे उपचारासाठी कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्याला वाडा पोलीस कोठडीत इतर 20 आरोपींच्या समवेत एकाच कोठडीत ठेवण्यात आले होते. तसेच त्या कोरोनाबाधित आरोपीस चार दिवसांपूर्वीच न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे अद्याप सुरु आहे. आतापर्यंत सोबतचे आरोपी आणि इतर अशा 44 जणांना कोरोन्टाईन करण्यात आले आहे. तर वाडा, गडचिंचले, डहाणू या भागातील संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. सध्या पालघर जिल्ह्यासाठी ही चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे.