नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाउनमध्ये सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून केंद्रांने हा निर्णय घेण्यापूर्वी देशभरातील विविध राज्यात अडकलेल्या कामगारांचे घरी जाण्याचे मार्ग खुले केले आहेत. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात अडकलेले कामगार आता आपआपल्या मूळगावी परतू लागले असून, त्यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून दाखल झालेल्या कामगारांपैकी सात कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
उत्तर प्रदेशात महाराष्ट्रातून दाखल झालेले ७ मजूर कोरोनाग्रस्त
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याची मुदत ३ मे रोजी संपणार होती. पण काही राज्यांची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने लॉकडाउनमध्ये दोन आठवड्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. केंद्राने हा निर्णय घेण्यापूर्वी विविध राज्यांनी कामगारांना परत नेण्याच्या मागणीचीही दखल घेतल्यामुळे विविध राज्यात अडकलेले आपापल्या राज्यातील कामगार, विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत नेण्याचे राज्यांनी काम सुरू केले आहे. रेल्वे मंत्रालयाने या कामगारांसाठी विशेष गाड्याही सोडल्या आहेत.
विविध राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने बस सोडल्या होत्या. विविध राज्यातील कामगारांना त्यामाध्यमातून परत नेण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील कामगारांना उत्तर प्रदेश सरकारने बसेसने घरी पोहोचवले होते. पण या कामगारांची तपासणी केल्यानंतर, यात सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. झाशी मार्गे हे कामगार बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. याविषयीची माहिती बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.