ऋषी कपूर यांच्या अंतिम क्षणांच्या त्या व्हिडीओची रूग्णालयाकडून होणार चौकशी


मुंबई : सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रूग्णालयात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. या दरम्यान ऋषि कपूर यांच्या अंतिम क्षणांचा व्हिडीओ लिक झाला होता. सोशल मीडियावर तो त्यांचा अंतिम व्हिडीओ असल्याचा दावा देखील केला जात आहे. रूग्णालयाने त्यासंदर्भात शुक्रवारी एक निवेदन जारी केले आहे. अभिनेते ऋषी कपूर यांच्या सोशल मीडियावर लीक झालेल्या व्हिडीओची चौकशी करणार असल्याचे त्यामध्ये रूग्णालयाने म्हटले आहे.

एक पोस्ट रूग्णालयाच्या फेसबुकवरील अधिकृत पेजवर लिहिण्यात आली आहे. त्यामध्ये सर एच एन रिलायंस फाउंडेशन रूग्णालयाच्या मॅनेजमेंटचा एक संदेश… आयुष्यभरासाठी सन्मान. या पोस्टमध्ये पुढे लिहिण्यात आले आहे की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमच्या रूग्णालयात दाखल असलेल्या एका रूग्णाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रूग्णालयातील रूग्णांची गोपनियता आणि त्यांचे खासगी आयुष्य आमच्यासाठी सर एच एन रिलायंस फाउंडेशनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा आम्ही निषेध करत आहोत. या घटनेची रूग्णालयातील व्यवस्थापन चौकशी करणार आहे. तसेच या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

गुरुवारी सकाळी अभिनेते ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. ज्यानंतर त्यांच्या अंतिम क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रूग्णालयाने सदर प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एका अन्य व्हिडीओमध्ये दिवंगत ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरही पुजाऱ्यासोबत दिसत आहे. ऋषी कपूर ज्यामध्ये रूग्णालयातील बेडवर झोपलेले आहेत. त्यांच्या पार्थिव शरीराला श्रद्धांजली अर्पित करण्यात येत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, ऋषी कपूर यांचे शव स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात येत आहे. तसेच त्यांच्या अंतयात्रेसाठी एका व्हॅनमध्ये ठेवले जात होते. याप्रकारचे इतरही अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Leave a Comment