राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7628, तर 323 जणांचा मृत्यु


मुंबई : राज्यात काल 811 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7628 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 13 जण मुंबईचे तर पुण्यातील चार आणि मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, धुळे, सोलापूर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू आहे. आतापर्यंत राज्यात 323 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 119 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यातील पाठवण्यात आलेल्या 1 लाख 8 हजार 972 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 162 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 7628 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 25 हजार 293 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 8124 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 957 कोरोनाग्रस्तांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरूष तर 6 महिला आहेत. त्यातील 11 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीन रुग्ण 40 वर्षांखालील आहे. मृत्यू झालेल्या 22 रुग्णांपैकी 13 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे आजार होते.

Leave a Comment