मुंबई महानगरपालिकेची ‘नर्सिंग होम’ आणि खाजगी दवाखान्यांना तंबी


मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शहरातील नर्सिंग होम आणि खाजगी दवाखान्यांना तंबी देत कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी खासगी दवाखाने, नर्सिंग होमची सुविधा सुरू ठेवण्याचे निर्देश देऊनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता नर्सिंग होम आणि खाजगी दवाखाने तात्काळ सुरू न केल्यास थेट ‘साथरोग कायदा 1897 ‘नुसार कारवाई करत परवाना रद्द करणार असल्याचा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच महापालिकेद्वारे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम व खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण या सेवा अनेक ठिकाणी अद्याप सुरू न झाल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे ‘नॉन कोविड’ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांना पालिका आयुक्तांनी सक्त निर्देश देऊन सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई करावी अशा सूचना पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला दिल्या आहेत.

नर्सिंग होम किंवा दवाखाने सोसायटी परिसरात, चाळीमध्ये, भाड्याच्या जागेत असून संबंधित सोसायटीतील व्यक्ती, मालक, शेजारी यांच्याकडून सेवा सुरू करण्यास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेल्यास किंवा दवाखाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावरही ‘साथरोग कायदा 1897 ‘नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी 24 विभागामधील संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी अधिकार्‍यांनी सर्वेक्षण सुरू करून आदेश पाळत नसणार्‍यांवर कारवाई सुरू करावे असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Leave a Comment