चीनने किंम जोंग उनसाठी उत्तर कोरियाला पाठवली वैद्यकीय तज्ज्ञांची फौज


चीनने एक विशेष टीम उत्तर कोरियाला किम जोंग उन संदर्भात सल्ला देण्यासाठी पाठवली असून वैद्यकीय तज्ज्ञांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित असलेल्या तीन सूत्रांनी दिली आहे. किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत अनेक माध्यमांमध्ये परस्परविरोधी बातम्या येत असतानाच चीनमधील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची फौज उत्तर कोरियाला गेली असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

चिनी तज्ज्ञांचे पथक किम जोंग उनच्या प्रकृती संदर्भात नेमके काय सल्लामसलत करणार आहे, ते राऊटर्स या वृत्तसंस्थेला स्पष्ट करता आलेले नाही. कार्डीओवॅस्क्यलर आजारामुळे १२ एप्रिलला किमवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या आठवडयाच्या सुरुवातीला सेऊल स्थित डेली एनके वेबसाइटने त्यातून त्याची प्रकृती आता सुधारत असल्याचे वृत्त दिले होते. सध्या नेहमीपेक्षा काहीही वेगळ उत्तर कोरियामध्ये घडत नसल्याचे दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या प्रसार माध्यमांमध्ये किम जोंग उनच्या प्रकृतीसंदर्भात सध्या उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. सोमवारी सीएनएन वाहिनीने अमेरिकेतील अधिकाऱ्याच्या हवाल्याने किम जोंग उनवर शस्त्रक्रिया झाली असून शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचे यावर लक्ष असल्याचे वृत्त दिले होते.

Leave a Comment