कोरोना संदर्भातील सर्व उपचार आणि चाचण्या निःशुल्क ; वैद्यकीय शिक्षणमंत्री यांची माहिती


लातूर : राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होणारे उपचार निःशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. कोरोना संदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार यापुढे राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये निशुल्क होणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना प्रादुर्भावाला महामारी घोषित करण्यात आले असून या आजाराच्या रुग्णांची राज्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निःशुल्क करण्यात आले आहेत. कोरोनाग्रस्तांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी आपला आजार लपवतात, असा अनुभव आहे. अधिकाधिक रुग्ण या निर्णयामुळे पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Comment