राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6817 वर, तर एका दिवसात 394 ने वाढला आकडा


मुंबई : काल दिवसभरात राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 394 नवीन रुग्णांची भर पडली असल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6817 वर पोहचल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 18 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 11 जण मुंबईचे तर पुण्यातील पाच आणि मालेगाव येथील दोन रुग्णांचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल 117 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 2 हजार 189 नमुन्यांपैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 6817 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 19 हजार 161 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 8814 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 957 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 12 पुरूष तर 6 महिला आहेत. त्यातील नऊ जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 6 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीन रुग्ण 40 वर्षांखालील आहे.

Leave a Comment