शिक्कामोर्तब! लॉकडाऊन उठेपर्यंत बंद राहणार राज्यातील दारुची दुकाने


मुंबई – सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे योग्य पालन केले तर दारु विक्रीची दुकाने सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते. पण ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत लागू असणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईत लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री ३० एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. पण लॉकडाउनच्या कालावधीत वाढ करण्यात आल्यामुळे मद्यविक्री ३ मे २०२० पर्यंत पूर्ण दिवस बंद राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यविक्री दुकानांबाबात काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती दिली होती. ट्विट करताना राजेश टोपे यांनी सांगितले होते की, लॉकडाउनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान याआधी फेसबुकवर संवाद साधताना त्यांनी मद्यविक्री दुकाने खुली करण्याचे संकेत दिले होते.

Leave a Comment