पुणे शहरात पुढील 7 दिवसांसाठी कर्फ्यू; लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई


पुणे : पुणे शहरातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हा कर्फ्यू पुढील सात दिवस लागू असणार आहे. या कालावधीत सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त उघडी राहणार आहेत.

पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा तसेच राज्य प्रशासनाने दिला आहे. गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तर, आजपासून पुणे जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे.

संक्रमणशील क्षेत्र (contempt zone) म्हणून संपूर्ण पुणे महापालिकेचे क्षेत्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्र, संपूर्ण हवेली तालुका, शिरुर आणि वेल्हे तालुक्यांचा काही भाग आणि बारामती नगर परिषदेची संपूर्ण हद्द जाहीर करण्यात आला आहे. 27 एप्रिलपर्यंत या संक्रमणशील क्षेत्राला सील करण्यात आला आहे. या क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात येता येणार नाही.

हे क्षेत्र वगळता इतर ठिकाणी उद्योग सुरू करायचे असल्यास ते स्थानिक कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करावे लागणार आहेत. या संक्रमणशील क्षेत्रातील आयटी कंपन्यांनाही पन्नास टक्के कर्मचाऱ्यांसह काम सुरू करता येणार नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या आयटी कंपन्या जशा पाच ते दहा टक्के कर्मचाऱ्यांसह काम करत आहेत तसेच त्यांना यापुढे देखील करावे लागणार आहे.

Leave a Comment