पालघर प्रकरणातील आरोपींना होणार कडक शिक्षा : मुख्यमंत्री


पालघर : पालघर येथील तीन जणांची दरोडेखोर असल्याच्या संशयावरून हत्या केल्या प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. तर हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळ्या धर्माचे नसल्यामुळे समाजात आणि समाज माध्यमांतून या प्रकरणात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.


देशभरातून पालघर येथील घटनेचा तीव्र निषेध होत आहे. हा गुन्हा ज्या दिवशी घडला, त्याच दिवशी आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन दिली आहे.


दरम्यान या घटनेबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, पालघरमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी असून कृपया या घटनेचे राजकारण करु नका. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी सुरू असून आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेचे कुणीही विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन असल्याचे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

Leave a Comment