भारताच्या कोरोनाविरोधातील लढाईला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम


जिनिव्हा : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना या जीवघेण्या व्हायरसने धुमाकूळ घातला असून या महामारीला रोखण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. भारतामध्ये या पार्श्वभूमीवर सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यातच जगातील अनेक देशांना भारताने कोरोनाच्या संकटाशी लढत असताना मदत देखील केली आहे.

भारताच्या कोरोनाविरोधातील लढाईचे जगभरात कौतुक होत असताना भारताला स्वित्झर्लंडने देखील अनोखा सलाम केला आहे. स्वित्झर्लंडने प्रसिध्द आल्प्स पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न पर्वतावर भारतीय तिरंगा झळकवत सलाम केला आहे. मॅटरहॉर्न पर्वतावर लाईट्सच्या मदतीने भारतीय तिरंगा झळकवला आहे. यामधून कोरोनाविरोधाती भारताची लढाई आणि जिंकण्याच्या प्रयत्नांना सलाम केला आहे.

युरोपात अनन्यसाधारण महत्व सुमारे 1200 किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतरांगेला आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गिक सौंदर्यातील ही पर्वतरांग एक महत्वाचे नाव असून जसे आपल्याकडे हिमालयाचे महत्व आहे तसेच युरोपात आल्प्स पर्वतरांगांचे महत्व आहे. मॅटरहॉर्न हे 14690 फूट उंचीचे आल्प्समधील 6 व्या क्रमांकाचे गिरीशिखर आहे.


स्वित्झर्लंडमधील लाईट आर्टिस्ट गेरी हॉफस्टेटर यांनी याच मॅटरहॉर्नवर तिरंगा झळकवला आहे. याबाबत माहिती देताना भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी गुरलीन कौर यांनी याचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विटरवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, जवळपास 800 मीटर उंचीवर तिरंगा, हिमालयासोबत आल्प्सची मैत्री, धन्यवाद!, असे म्हटले आहे.

माहितीनुसार मागील 24 मार्चपासून या पर्वतावर कोरोना महामारीविरोधात जगातील देशांची एकजूट दर्शवण्यासाठी विविध देशांचे झेंडे झळकवण्यात आले आहेत. कोरोनाची स्वित्झर्लंडमधील आतापर्यंत 18,000 लोकांना बाधा झाली आहे. यामुळे 430 लोकांचा मृत्यू झाला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 154126 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 22 लाखांवर पोहोचली आहे. जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 2,248,330 आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे.

Leave a Comment