भारतीय नौदलातील नौसैनिकांना कोरोनाची लागण


मुंबई : भारतीय नौसेनेतही आता कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. मुंबईतील तळावरच्या भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रे यातील 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी 20 जण हे नौसैनिक म्हणून नौदलाच्या सेवेत आहेत. आयएनएस आंग्रे येथील एक नौसैनिक 7 एप्रिल रोजी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. अन्य नौसैनिकांनाही त्याच्याच संपर्कातून कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सध्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नौसैनिकांपैकी अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणेही दिसून आलेली नाहीत. पण या साऱ्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. तर कोरोना बाधित नौसैनिकांवर आयएसएचएन अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आयएनएस आंग्रेच्या परिसरातही लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.

भारतीय नौदलातील नौसैनिकांना कोरोनाची लागण झाल्याची ही पहिलीच घटना असून भारतीय सैन्यदलातील आठ जवानांनाही याआधी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. सध्या नौदलातील या नौसैनिकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. शोध मोहिमही त्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे आयएनएस आंग्रे हे तळ आहे. नौसैनिकांची येथे निवास्थाने आहेत. पश्चिम नौदल कमांडच्या वेगवेगळया ऑपरेशन्ससाठी याच तळावरून मदत करण्यात येते.

भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रे या मुंबईतील तळावरच्या आसपासच्या परिसरात नौसैनिकांचा आवश्यक कामांसाठी वावर असू शकतो, असा अंदाज नौदलाकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नौदलाच्या तळांवरील असलेल्या निवासी वसाहतीत नौसैनिक जात नाहीत. तर नौदलाच्या युद्धनौका किंवा पाणबुडीवर मात्र एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment