वांद्रे गर्दी प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतीच्या अध्यक्षाला अटक


मुंबई : विनय दुबे नावाच्या व्यक्तीला मुंबईतील वांद्रे स्टेशनवर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला नवी मुंबई पोलिसांनी ऐरोलीतून ताब्यात घेतले आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री उशिरा त्याला वांद्रे पोलिसा स्थानकात हजर करण्यात आले, तिथे त्याला अटक करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करुन पुढील कारवाई केली जाईल. विनय दुबेवर लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप आहे.

उत्तर भारतीय महापंचायतचा विनय दुबे हा अध्यक्ष आहे. मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी विनय दुबेचा दांडगा जनसंपर्क आहे. ‘चलो घर की ओर’ मोहीम विनय दुबेने सुरु केली होती. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हे आवाहन केले होते. त्याने यासंदर्भात ट्विटही केले होते. स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा त्याने दिला होता.

मंगळवारी वांद्रे स्टेशनबाहेर सोशल मीडियावरील त्या संदेश/आवाहनामुळेच मजुरांची गर्दी जमा झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. बहुसंख्य मजूर उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्चिम बंगालमधील होते. पोलिसांनी दुबेविरोधातील आयपीसीच्या कलम 117, 153 अ, 188, 269, 270, 505(2) आणि साथीचे रोग कायद्याच्या कलम 3 अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

शनिवारी विनय दुबेने एक व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला होता. विनय दुबे व्हिडीओत परप्रांतीयांना सोबत घेऊन आपण उत्तर प्रदेशपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचे सांगत आहे. मजुरांना आपापल्या गावाला पाठवण्याची सोय केली नाही आणि हे प्रकरण 14 ते 15 तारखेपर्यंत मिटले नाही तर 20 एप्रिलला पदयात्रेला सुरुवात करु, अशी धमकी त्याने व्हिडीओत दिली होती. यावेळी त्याने आपल्याला पाठिंबा असणाऱ्यांना व्हॉट्सअॅपला मेजेस टाकावा असे आवाहन केले होते.

दरम्यान, काल (14 एप्रिल) दुपारी मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात मजुरांची मोठी गर्दी जमा झाली होती. आमच्या घरी आम्हाला सोडा, अशी मागणी ते करत होते. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. लॉकडाऊन उठेल असा विश्वास मजुरांना होता. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.

Leave a Comment