लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची नवी नियमावली


नवी दिल्ली: मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे कठोर पालन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात सांगितले होते. केंद्र सरकारकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात आली आहेत.

मार्गदर्शक तत्वे केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली असून यात सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यवस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा. दारु, गुटखा, तंबाखूची विक्री बंद ठेवण्यात यावी यासह अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यात आजपासून या गोष्टींवर निर्बंध

20 एप्रिलनंतर या गोष्टींची (कोरोना हॉटस्पॉट असलेली क्षेत्रे वगळता) अंमलबजावणी

  • आयटी कंपन्या 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करु शकतील
  • ई-कॉमर्स कंपन्यांनाही काम करण्याची परवानगी
  • कुरिअर सेवांना काम करण्याची परवानगी
  • लॉकडाऊन अडकलेल्या लोकांसाठी हॉटेल आणि लॉज सुरु करणार
  • मोटर मेकॅनिक, कार पेंटर, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर लोकांना काम करण्याची परवानगी
  • SEZ मधील उद्योगांना काम करण्याची परवानगी.
  • गावांमध्ये रस्ते आणि इमारत बांधकामांना परवानगी
  • कामाच्या ठिकाणी शिफ्टमध्ये एक तासाचा ब्रेक असावा
  • ज्यांची मुलं पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत अशा कामगारांना शक्यतो वर्क फ्रॉम होम द्यावे

ज्या क्षेत्रांमध्ये नियम शिथिल केले आहेत त्याच क्षेत्रांमध्ये सरकारच्या या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ही केली जाईल. अशा क्षेत्रांना 20 एप्रिलपर्यंत निवडले जाईल. कोरोना हॉटस्पॉट ज्या ठिकाणी नाही किंवा कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता नाही अशा विभागात ही सवलत दिली जाणार आहे.

3 मेपर्यंत आपल्या सर्वांना, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनमध्येच राहावे लागेल. पुढच्या एका आठवड्यात कोरोना विरोधातील लढाईमध्ये नियम आणखी कठोर करण्यात येतील. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्हा, ठिकाण आणि राज्यावर बारिक नजर ठेवली जाईल. तिथे लॉकडाऊनचे किती पालन होत आहे, त्या क्षेत्राने कोरोनापासून स्वतःला कितपत वाचवले आहे, हे पाहिले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. तसेच ते म्हणाले की, या अग्निपरीक्षेत जी क्षेत्र सफल होतील, जे हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांची हॉटस्पॉटमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता कमी असेल तिथे 20 एप्रिलपासून वर दिलेल्या आवश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Comment