कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला यावर्षी मोठा फटका बसण्याची शक्यता


मुंबई – देशात पसरलेल्या कोरोनामुळे देशासह अनेक राज्यातील उद्योगधंदे बंद असून याचा मोठा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. दरम्यान काल लॉकडाउनच्या कालावधीत ३ मे पर्यंतची वाढ करण्यात आल्यामुळे आर्थिक नुकसान वाढत चालले आहे. लॉकडाउनचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसलेला असून घरांच्या किंमती २० टक्क्यांनी घसरतील असा अंदाज एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केला आहे. दीपक पारेख नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या बेविनारमध्ये बोलत होते.

१० ते १५ टक्क्यांनी किंमती घसरतील असा नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलचा अंदाज आहे. पण आपण २० टक्क्यांची तयारी ठेवली पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांची नोकरी सुरक्षित आहे किंवा पैसे आहेत त्यांच्यासाठी ही घर खरेदी करण्याची सर्वोत्तम संधी असल्याचेही यावेळी ते म्हणाले. रिअल इस्टेट मार्केट अनेक कारणांमुळे आधीच अडचणींचा सामना करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे मोठा फटका बसला असताना यावर्षी निवासी बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसेल असा अंदाज आहे. रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंगनुसार, निवासी बांधकाम क्षेत्राच्या मागणीत खूप मोठी घसरण होणार आहे. २०१७-१९ दरम्यान मागणीत चांगली वाढ दिसत होती.

बांधकाम व्यवसायिकांना मोरॅटोरिअमचा (भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या अधिस्थगन) पर्याय शेवटी वापरा असा सल्ला दीपक पारेख यांनी दिला आहे. तसेच आपले लक्ष नवीन प्रोजेक्ट लाँच करण्यापेक्षा जे प्रोजेक्ट सुरु आहेत ते पूर्ण करण्यावर केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. घरी कमी पैसे न्या, कंपनीत जास्त गुंतवा. घरखर्च कमी करा. खर्च करताना हात थोडा आखडता घ्या, असे आवाहन देखील दीपक पारेख यांनी केले आहे.

२०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था दोन टक्क्यांनी घसरेल असा अंदाज दीपक पारेख यांनी व्यक्त केला आहे. सोबत जी-२० देशांमध्ये भारत, चीन आणि इंडोनेशिया हे तीन देश सकारात्मक प्रगती करतील असेही म्हटले आहे. स्टार्ट अपसंबंधी बोलताना दीपक पारेख यांनी भारत यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. स्टार्टअप्स खूप चांगली कामगिरी करतील आणि काही वेगळे उपाय काढतील असा मला आत्मविश्वास आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दीपक पारेख यांनी सांगितले आहे.

यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी कोरोनानंतर कामगारांना लवकरात लवकर परत आणून काम सुरु केले पाहिजे असा सल्ला दीपक पारेख यांनी दिला आहे. तसेच काही इन्सेन्टिव्ह त्यांना दिला पाहिजे जेणेकरुन त्यांच्यासमोर अडचणी कमी होतील, असेही म्हटले आहे. त्यांनी राज्य सरकारला सल्ला देताना सांगितले की, किमान काही वेळासाठी खासकरुन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सरकारने प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या स्टॅम्प ड्युटीवर सूट दिली पाहिजे.

Leave a Comment