
मुंबई – मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका कोरोनाग्रस्त २९ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या महिलेने १५ एप्रिलच्या मध्यरात्री रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून या घटनेची आग्रीपाडा पोलिसांत नोंद झाली असून त्याप्रकरणी तपास सुरु आहे. आत्महत्या केलेली महिला ही वरळीची रहिवासी होती. तिच्यावर नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उपचार सुरु होते. या महिलेला कोरोनाची लागण होण्यापूर्वी दम्याचा आजार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते.
मुंबईतील कोरोनाग्रस्त महिलेची हॉस्पिटलमध्ये आत्महत्या
दरम्यान, मुंबईत गेल्या चोवीस तासात आणखी २०४ नवीन रुग्ण सापडले आहेत, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १११ झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा १७५३ वर पोहोचला आहे. यांपैकी २३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी मृत पावलेल्या ११ जणांमध्ये ३ महिला असून ८ पुरुष आहेत. यामध्ये सर्वात कमी वय असलेल्या ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश असून त्याला दम्याचा आजार होता. तर इतर नऊ जणांना मधुमेह, हृदयविकार, दमा असे आजार होते. तर दोन जणांना कसलाही आजार नव्हता.
