पुढील आठवड्यात होईल राज्यातील झोनबाबत निर्णय


सांगली : राज्याचे कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगलीतील शिवभोजन थाळी आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा आढावा घेतला त्यावेळी बोलताना सांगली, मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद यांसह अन्य जिल्हे रेड झोनमध्ये गेलेले नसून तसा निर्णय अद्याप झालेला नाही. असे कोणतेही झोन केंद्र अथवा राज्य सरकारने घोषित केलेले नाहीत, पुढील आठवड्यात यासंदर्भात केंद्र सरकारच्या परवानगीने निर्णय होईल, असे स्पष्टीकरण दिले.

14 एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीनुसार राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु अद्याप असे कोणत्याही प्रकारचे झोन सरकार किंवा प्रशासनाकडून केलेले नाहीत, असे विश्वजित कदम यांनी सांगितले आहे.

अजून रेड, ऑरेंज, ग्रीन झोन केंद्र सरकारने ठरवले नाहीत. पुढील आठवड्यात याबाबतीत केंद्र सरकारच्या परवानगीने निर्णय होईल. झोनिंगच्या बाबतीत प्रत्येक राज्य सरकारने आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन केंद्र सरकारची परवानगी घेऊन तो निर्णय घ्यायचा असल्यामुळे लोकांनी पॅनिक न होता लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहनही विश्वजित कदम यांनी केले आहे.

Leave a Comment