ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाची नियमावली


नवी दिल्ली : विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका असल्यामुळे केंद्र सरकारने देशातील 60 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठांसाठी काही नियमावली जाहीर केली असून या नियमावलीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत.

या नियमावलीत ज्यांना श्वसनाचा विकार आहे, जे हार्ट पेशंट आहेत, ज्यांना किडनीचा त्रास आहे अशा ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याच्या सूचना यामध्ये करण्यात आल्या आहेत. ही नियमावली केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जाहीर केली आहे. 60 ते 70 या वयोगटातील वृद्धांची संख्या देशात 8 कोटी 80 लाख, तर 70 ते 80 या वयोगटातील नागरिकांची 6 कोटी 40 लाख संख्या आहे. वृद्धांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. बाहेरुन येणाऱ्या लोकांना भेटू नये. घरातल्या घरातच त्यांनी हालचाल करत, योगा किंवा काही हलके व्यायाम प्रकार करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पुरेसे पाणी सतत प्यावे अशा सूचना यात आहेत. त्याचबरोबर जे लोक घरात अशा आजारी वृद्धांची काळजी घेत आहेत, त्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कुठलीही मदत त्यांना करताना आधी स्वत:चे हात स्वच्छ धुवावेत. घरातील वयोवृद्ध सतत वापरत असलेल्या वॉकर, व्हीलचेअरसारख्या वस्तू नियमितपणे स्वच्छ कराव्यात.

तसेच ज्येष्ठांचा मानसिक आरोग्य नीट राहावे यासाठी त्यांच्याशी सोशल डिस्टन्सिंग सांभाळत संवाद करत राहावा, संगीत, वाचन अशा छंदांमध्ये त्यांनी आपले मन रमवावे अशाही सूचना सरकारने केल्या आहेत. अशा आजारामध्ये त्यांनी स्वत:ला एकटे ठेवू नये आणि खोलीत बंद करुन स्वत:चे कुठले उपचार करण्याचे प्रकार करु नयेत असे देखील नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment