कुणालाही दिलेली नाही ऑनलाईन मद्य विक्रीची परवानगी : राज्य उत्पादन शुल्क विभाग


मुंबई : कोणालाही ऑनलाइन मद्य विक्री करण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला नसल्यामुळे यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात आले आहे. सर्व प्रकारची मद्याची दुकाने लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहेत. अनेकजण या परिस्थितीचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर फसव्या जाहिराती देऊन ग्राहकांची फसवणूक करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आता अशा फसव्या जाहिरात देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर ऑनलाईन वाईन किंवा ऑनलाईन लिकर या मथळ्याखाली घरपोच मद्य सेवा दिली जाईल, अशा प्रकारच्या फेक मेसेजद्वारे फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल असे सांगून चोरट्यांकडून फसवणूक केली जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन झालेला आहे. राज्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरू आहे.

राज्यात यासंदर्भात शुक्रवारी 147 गुन्हे नोंदविण्यात आले असून 66 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 11 वाहने जप्त करण्यात आली असून 30 लाख 48 हजार किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर 24 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात दोन हजार 281 गुन्हे नोंदविण्यात आले असून 892 जणांना अटक करण्यात आली आहे. 107 वाहने जप्त करण्यात आली असून 5.55 कोटी रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता 24×7 सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18008333333 तर व्हाट्सॲप क्रमांक 8422001133 आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment