संकटसमयी देखील एलआयसी विमाधारकांच्या ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बँकांचे हफ्ते भरण्यासाठी केलेल्या मुदतवाढीच्या घोषणेनंतर विम्याचे मार्च आणि एप्रिलमधील हप्ते भरण्यासाठी आता ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ असे म्हणणाऱ्या भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) 30 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर विमाधारकाचा कोरोनामुळे मृत्यू ओढवल्यास अन्य प्रकरणांप्रमाणेच त्यांच्या भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे देखील म्हटले आहे.

एलआयसीने हे पाऊल कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पॉलिसीधारकांना दिलासा देण्यासाठी उचलले आहे. एलआयसीने म्हटले आहे की, 22 मार्चला फेब्रुवारी महिन्याच्या प्रीमियमसाठी दिलेला वाढीव कालावधी संपणार आहे. ही अवधी आता 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. आरोग्य तपासणीशिवाय ज्या विमाधारकांच्या विम्याला फेरमुदत देता येणे शक्य आहे, त्या प्रकरणांत ऑनलाईन कार्यवाही केली जाईल. एलआयसीच्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी विम्याचे हप्ते भरताना कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. संकेतस्थळावर आवश्यक माहिती दिल्यास विम्याचा हप्ता भरता येईल. एलआयसी पे डायरेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करूनही हप्ता भरता येईल.

आपल्या प्रिमियमचे पेमेंट या काळात ज्यांना करायचे आहे त्यांच्यासाठी देखील एलआयसीने सोय केली आहे. नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम, फोनपे, गूगल पे, भीम, यूपीआय या माध्यमातून ज्यांना प्रिमियम भरायचा आहे, ते भरु शकतात. तसेच आयडीबीआय बँक आणि अॅक्सिस बँकांच्या शाखांमध्ये आणि ब्लॉक स्तरावरील सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) रोख रकमेद्वारे देखील प्रिमियम भरता येऊ शकते.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे विमाधारकाचा जर कोरोनामुळे मृत्यू झाला तर अन्य प्रकरणांप्रमाणेच त्याचा भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आतापर्यंत 16 विमाधारकांच्या कुटुंबांना भरपाई देण्यात आल्याची माहिती एलआयसीकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment