चीन-अमेरिका आणि जर्मनीच्या तुलनेत भारतातील मृत्युदर चिंताजनक


मुंबई – जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसचे सध्या अक्षरशः मृत्यूतांडव सुरु असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यातच आपल्या देशाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सुरुवातीच्या काळात झालेल्या बळींच्या आकड्यांचे विश्लेषण केल्यास मृत्यूदराचे प्रमाण भारतामध्ये या देशांपेशा जास्त असल्याचे समोर आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वेगाने होत असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सात हजाराच्यापुढे गेला आहे. जरी धीम्या गतीने कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात होत असला तरी यामध्ये चीन, अमेरिका आणि जर्मनी यांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत गेला. पण सध्याची परिस्थिती पाहता. भारतातील मृत्यूदर या देशांच्या तुलनेत अधिक आहे.

भारतामध्ये कोरोना सध्या वेगाने पसरत असून तो आता समुह संक्रमणाच्या दारात उभा आहे. भारतामधील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहेच, त्याचबरोबर मृतांच्या आकड्यातही झपाट्याने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)जगभरातील देशांच्या स्थितीच्या अहवालानुसार अमेरिका, जर्मनी, चीनमध्ये सरासरी भारतामध्ये सध्या रुग्णांच्या संख्येएवढी संख्या असताना मृत्यूचा या देशातील आकडा खूप कमी होता. त्या तुलनेत भारतामध्ये जास्त मृत्यू झाले आहेत.

कोरोनामुळे अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांमध्ये झालेल्या मृत्यूची सरासरी भारतापेक्षा खूप कमी आहे. आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील एक लाख ७१ हजार जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी झाली असून त्यापैकी ७,४४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत जेव्हा ७९८७ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. जर्मनी असा एकमेव देश आहे ज्यामध्ये ७१५६ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर फक्त १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये पहिल्या ७७३६ कोरोना रूग्णांपैकी १७० जणांचा मृत्यू झाला होता. यावरूनच असा अंदाज लावला जात आहे की इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चिंताजनक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार भारतातील ७४४७ कोरोनाग्रस्तांपैकी २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा मृत्यूदर याच आधारावर ३.२१ टक्के एवढा आहे. दुसरीकडे ज्यावेळी अमेरिकेत ७०८७ जणांना कोरोनाची लागण झाली तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानुसार अमेरिकेचा मृत्यूदर १.४१ टक्के असा होतो. जर्मनीचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. जर्मनीमध्ये ज्यावेळी ७१५६ कोरोनाचे रूग्ण झाले, तेव्हा फक्त १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच आधारावर जर्मनीचा मृत्यूदर ०.१८ टक्के आहे. सात हजार रूग्ण झाले तेव्हा चीनचा मृत्यू २.२ होता.

Leave a Comment