दररोज जवळपास ४५ हजार जणांच्या पोटाची खळगी भरणार अभिनेता सोनू सूद


राज्य प्रशासनासह प्रत्येक नागरिक कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या लढ्यात नागरिकांच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटीही पुढे सरसावले आहेत. या लढ्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी आर्थिक मदत देखील देऊन केली आहे. तर गरजूंपर्यंत जेवण पुरवण्याचे काम काही कलाकार करत आहेत. यामध्ये काही दिवसांपूर्वी जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अभिनेता सोनू सूदने त्याचे मुंबईतील हॉटेल खुले केले. डॉक्टर आणि अन्य कर्मचारी या हॉटेलमध्ये आराम करु शकतात, असे त्याने सांगितल्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने यावेळी दररोज जवळपास ४५ हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात ‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, आपले वडील शक्ती सागर सूद यांच्या नावाने सोनू सूदने एक अन्नछत्र सुरु केले आहे. त्याच्या अन्नछत्राचे ‘शक्ती अन्नदानम योजना’, असे नाव असून तो या अन्नछत्रांतर्गत दररोज मुंबईतील जवळपास ४५ हजार लोकांना जेवण पुरवणार आहे.

आपल्या सगळ्यांना सध्याच्या या कठिण समयी एकत्र येणे गरजेचे आहे. दोन वेळचे जेवण आणि डोके झाकायला आपल्याकडे छप्पर असल्यामुळे आपण निश्चिंत आहोत. पण समाजात असेही काही जण आहेत, ज्यांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे या लोकांच्या मदतीसाठी मी माझ्या वडिलांच्या नावाने एक अन्नछत्र सुरु केले आहे. या अन्नछत्राच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना जेवण आणि किराणा सामान पुरविणार आहोत. मला आशा आहे, या अन्नछत्राच्या माध्यमातून मी शक्य तितक्या नागरिकांची मदत करु शकेन, असे सोनू सूदने म्हटले आहे.

Leave a Comment