मुंबईतील ताज हॉटेलमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह


मुंबई – मुंबईत शनिवारी कोरोनामुळे २५ वर्षांच्या युवकासह १२ जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला आहे. तर काल कोरोनाची लागण झालेल्या नव्या १८९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११८२ वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारापार झाल्यामुळे मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ताज महल पॅलेस हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे हॉटेलमध्ये भितीचे वातावरण आहे. मुंबईतील रूग्णालयात या सहा कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

इतर प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कोरोनाची ताज हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना लागण झाली असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार तातडीने सुरू करण्यात आले आहेत. त्या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ताज हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत ताज हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळत असलेल्या द इंडियन हॉटेल्स कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व ज्यांच्यात कोरोना सदृष्य लक्षणे आढळली आहेत, अशा सर्वांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. सरकारच्या स्थानिक यंत्रणांच्या सर्व सूचना पाळल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment