
मुंबई : आज मुंबईतील कोरोना हॉटस्पाट असलेले विभागांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. मुंबईत कालपर्यंत ५ हॉटस्पॉट विभाग होते. आता त्यात एल विभाग कुर्ला आणि एम पूर्व चेंबूर, गोवंडी विभागांची भर पडली आहे. दरम्यान वरळीचा समावेश असलेल्या जी साऊथ वॉर्डमधील कोरोनाग्रस्तांची संख्या २४६ वर पोहोचली आहे. भायखळ्याच्या ई विभागाताही रूग्णांची शंभरी ओलांडली असून येथे १११ रूग्ण झाले आहेत.
मुंबईत कोरोनाचे आणखी दोन नवे हॉटस्पॉट
नाना चौक मलबार हिल परिसर असलेल्या डी विभागात ९४ तर गोवंडी, चेंबूर भागाचा समावेश असलेल्या एम ईस्ट मध्ये ७० रुग्ण झाले आहेत. वांद्रे पूर्वच्या एच पूर्व विभागात ६७ रूग्ण, अंधेरी पश्चिम भाग असलेल्या के पश्चिममध्ये ६१ रूग्ण तर कुर्ला भागाचा समावेश असलेल्या एल वॉर्ड मध्ये ५७ रुग्ण आहेत.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेने मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मालाड पूर्व येथील रहेजा टाऊनशिप भागात तोंडावर मास्क न लावता एक व्यक्ती फिरत असल्याची तक्रार पालिकेच्या पी उत्तर विभागाकडे आली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने पालिकेने त्याच्यावर कारवाई करत १ हजार रूपयांचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. त्यानुसार ही पहिली कारवाई करण्यात आली.
