पंतप्रधान मोदी रविवारी लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता


नवी दिल्ली : लॉकडाऊनची मर्यादा 14 एप्रिलहून अधिक वाढविण्याबाबत मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक राज्यांमध्ये वाढत असल्यामुळे त्या राज्यांमध्ये असलेली लॉकलाऊनची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतरच लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय़ घेण्यात येईल. त्याचबरोबर सांगितले जात आहे की, लॉकडाऊन वाढल्यामुळे काही भागात अंशत: सूट मिळू शकते. कारण लॉकडाऊन मोठ्या काळासाठी कायम राहिल्याने विषम आर्थिक परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशांतर्गत अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त प्रवासावर प्रतिबंध असू शकतो. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांमंध्ये झालेल्या बैठकीच्या दोन दिवसांपूर्वी ओडिशाने गुरुवारी 30 एप्रिलपर्यंत ल़ॉकडाऊनची मर्यादा वाढवली आहे. ओडिशा हे लॉकडाऊनची मर्यादा वाढवणारे पहिले राज्य ठरले आहे. लॉकडाऊन वाढविण्याबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रेशखर राव यांच्यासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment